जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरवपूर्ण सन्मान

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी : इमरान खान) :

दि. १ एप्रिल २०२६ रोजी जळगाव महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते महापौर दालनात भावपूर्ण सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि “पंच परिवर्तन” हे पुस्तक देऊन त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यात आली.

सत्कारमूर्तींमध्ये संजय वसंतराव महाजन आणि विजय देवरे यांचा समावेश होता. संजय महाजन यांनी १९९६ पासून, नगरपालिका काळापासून ते आजपर्यंत सुमारे ३० वर्षे वाहन चालक म्हणून प्रामाणिक सेवा बजावली. त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नगरसचिव कार्यालयात दीर्घकाळ निष्कलंक सेवा बजावणारे विजय देवरे यांचाही कुटुंबीयांसह गौरव करण्यात आला.

महापौर दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यावर भर दिला असून, निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा त्याच उपक्रमांचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्गदर्शन करताना महापौर म्हणाल्या, “नगरपालिका ते महानगरपालिका असा प्रवास तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला आहे. निवृत्तीनंतर तुमच्या आयुष्याची ‘सेकंड इनिंग’ सुरू होत आहे. हा काळ आनंदाने, समाधानाने आणि नव्या उमेदीने जगा.”

सत्काराला उत्तर देताना दोन्ही कर्मचाऱ्यांनी नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी समाधानाची बाब असल्याचे सांगितले. तसेच महापौरांनी दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व निवेदन पुरुषोत्तम जोशी यांनी केले. यावेळी नगरसचिव सतीश शुक्ला यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS