जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हॉटेल आदित्याजवळील रिक्षा स्टॉप परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल विनोद वाणी (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) हे २५ मार्च रोजी रात्री सुमारे ११ वाजता हॉटेल आदित्य समोरील बंगला चौकातील रिक्षा स्टॉपजवळ उभे होते. त्यावेळी संशयित आरोपी हर्षल वाणी (मजुरी काम करणारा) आणि कृष्णा सोनवणे हे दारूच्या नशेत तेथे आले.

“तू माझ्या भावाला मागच्या वेळी का मारहाण केली होती?” असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींपैकी एकाने खिशातून चॉपरसारखे धारदार शस्त्र काढून हर्षलच्या पाठीवर वार केला.

या हल्ल्यात हर्षल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी योगेश बेलदार करत आहेत. दरम्यान, शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS