जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील महाराणा प्रताप हायस्कूल परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्याजळगावात भरदिवसा दुचाकीस्वार चोरट्यांचा धाडसी प्रकारतील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
निर्मला जनार्दन चौधरी (वय ६८, रा. प्रेमनगर, जळगाव) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या ३० जानेवारी रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता पती व भाऊ वासुदेव धांडे यांच्यासह बेडाळे नगर येथून जेवण करून पायी घराकडे जात होत्या. महाराणा प्रताप हायस्कूलजवळील डॉ. पाध्ये यांच्या घरासमोरील रस्त्यावरून जात असताना, मागून दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले.
दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने निर्मला चौधरी यांच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाची व अंदाजे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची काळी मण्यांची पोत जोरात हिसकावून घेतली. त्यानंतर दोन्ही चोरटे महाराणा प्रताप हायस्कूलच्या मागील बाजूने सुसाट वेगाने पळून गेले.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उल्हास चव्हाटे हे पुढील तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.









