मुंबई (वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित अनंतराव पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजितराव पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता राजभवनात पार पडलेल्या शपथविधीत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
बुधवार, दि. २८ रोजी बारामती तालुक्यात झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले होते. या अपघातात अन्य चार जणांनाही आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदार व नेत्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली.
गटनेतेपदाची निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर विधिमंडळ गटनेतेपदाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच राज्यपालांना आवश्यक पत्र दिल्यानंतर राजभवनात शपथविधीची तयारी करण्यात आली.
सायंकाळी ५ वाजता पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह आमदार व पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेही प्रामुख्याने उपस्थित होते.
सुनेत्रा अजितराव पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हा एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.









