संत ज्ञानेश्वर विद्यालयात “अभ्यास मित्र” उपक्रमास मंजुरी

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “अभ्यास मित्र” या अभिनव उपक्रमास बालसभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः आयोजित केलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळणार आहे.

बालसभा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वक्तृत्व, कविता सादरीकरण, नाट्यछटा आणि सामान्य ज्ञान अशा विविध कलागुणांना वाव मिळणार आहे. याशिवाय “अभ्यास मित्र” उपक्रमाद्वारे प्रगत व अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांची जोडी करून परस्पर सहकार्याच्या माध्यमातून शिक्षण अधिक सोपे व परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार आहे.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच शिक्षिका रूपाली आव्हाड आणि पर्यवेक्षिका शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

या निर्णयाचे पालक व शिक्षक वर्गातून स्वागत करण्यात आले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS