संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘चिमणी संवर्धनाची गुढी’ उभारून पर्यावरणाचा संदेश

जळगाव(प्रतिनिधी):शहरातील रामेश्वर कॉलनी येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ हा महत्त्वपूर्ण संदेश देणारी आगळीवेगळी गुढी उभारण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शाळेतील इको क्लबच्या वतीने पर्यावरणातील पशुपक्षी, प्राणी व वनस्पती यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. याच अंतर्गत चिमणी संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. तसेच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित नैसर्गिक घरटी तयार करून त्यांचे वाटपही करण्यात आले.

या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे समाजात पक्ष्यांबद्दल जागरूकता वाढत असल्याचे दिसून आले. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे चिमण्यांची संख्या वाढण्यास नक्कीच मदत होईल.”

शाळेत नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS