भरदिवसा रिक्षाचालकाची ४५ हजारांची रोकड लंपास

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या नवीपेठ परिसरात भरदिवसा एका रिक्षाचालकाची ४५ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा खुर्द येथील रहिवासी आणि व्यवसायाने रिक्षाचालक असलेले शुभम प्रकाशचंद राठी (वय ३१) हे १३ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास नवीपेठ भागातील एथर शोरूमजवळ थांबले होते. यावेळी त्यांच्या जवळील निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत एकूण ४५ हजार रुपयांची रोकड होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने राठी यांची नजर चुकवून ही पिशवी लंपास केली.

या चोरीत एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. घटनेनंतर शुभम राठी यांनी १४ मार्च रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास शहराचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक शिरसाठ करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS