पुणे (प्रतिनिधी): गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर (रा. वानवडी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध एका व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात अर्ज दाखल केला होता. या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक संदीप खेडकर करत होते. मात्र तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रारदाराने ३ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. पडताळणीदरम्यान खेडकर यांनी स्वतःसाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मिळून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.
यानंतर एसीबीने तत्काळ कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.









