चंद्रपूर (प्रतिनिधी) : शहरातील उर्जानगर परिसरात बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकत तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी उर्जानगर मेजर गेट परिसरातील राजश्री अपार्टमेंट येथे काही व्यक्ती अवैधरित्या बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०३ वर छापा टाकला.
हा फ्लॅट बंगाली कॅम्प परिसरातील सुमित पॉल यांचा असून त्यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना तो भाड्याने दिला होता. पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता आतमध्ये बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचे तब्बल १० बॉक्स जप्त केले. तसेच नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा एप्सन कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९१ लाख १५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेशातील शुभम दिनेश नागर (वय २६) या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. बनावट नोटा तयार करून त्या बाजारात चलनात आणण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.









