जळगाव (प्रतिनिधी) :
वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एरंडोल तालुक्यातील दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नरेश भास्कर शिरुडे (वय ४१, तलाठी, सजा उत्राण अहिर गढी, ता. एरंडोल) आणि शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, तलाठी, सजा उत्राण गुजर गढी, ता. एरंडोल) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदाराचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर दि. २७ जानेवारी रोजी सकाळी उत्राण येथील गिरणा नदीपात्रात तलाठी नरेश शिरुडे यांनी पकडले होते. काही वेळानंतर ते ट्रॅक्टर सोडून देण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर सोडल्याच्या बदल्यात व कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी शिरुडे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी दरम्यान शिरुडे यांनी “मी इतरांकडून जास्त पैसे घेतो, पण तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून फक्त ३० हजार रुपये घेतो,” असे म्हणत लाचेची रक्कम वाढवली. तसेच दुसरे तलाठी शिवाजी घोलप यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीने सापळा रचून एरंडोल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरील खोलीत शिवाजी घोलप यांनी नरेश शिरुडे यांच्या उपस्थितीत ३० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख, २,९५० रुपये किमतीची ‘पॉल जॉन’ कंपनीची ७५० मिली व्हिस्कीची बाटली (गिफ्ट रॅपरमध्ये) तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.









