लातूर (प्रतिनिधी): जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) १६ व १७ मार्च २०२६ रोजी विवेकानंद चौक व देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजनबद्ध छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत वाहनांसह ३ लाख ४० हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने अचूक नियोजन करत ही कारवाई करण्यात आली.
विवेकानंद चौक परिसरातील कारवाई
१६ मार्च रोजी नांदेड रोडवरील बालाजी नगर परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच एक आरोपी पसार झाला, तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी –
युनुस इसाक शेख (वय ६०)
समीर हाफिज शेख (वय ३३)
फरार आरोपी – आरफात युनुस शेख
यांच्याकडून ३९,५०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
देवणीतील सलग तीन कारवाया
१७ मार्च रोजी देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी सापळे रचून स्कुटी व मोटारसायकलवरून गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
सलीम सत्तार तांबोळी याच्याकडून १,३१,३०० रुपयांचा मुद्देमाल
रईस युनुस मनियार याच्याकडून १,०५,३२५ रुपयांचा मुद्देमाल
आखील रहीमसाब कुरेशी याच्याकडून ६४,१८० रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला.
या सर्व कारवायांमध्ये गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व वाहने असा एकूण ३.४० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे दाखल, तपास सुरू
सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कलम ५९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या मोहिमेत पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हाल्लाळे यांनी सहभाग घेतला.
पोलीसांचा इशारा
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची साठवण, विक्री किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा लातूर
पोलिसांनी दिला आहे.








