जळगाव: (प्रतिनिधी)
शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी भागात गुरुवारी दुपारी वैयक्तिक वादातून गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिस्तरी कामाचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणावरून तुषार सोनवणे या व्यक्तीने मुस्तफा नावाच्या तरुणावर गोळी झाडल्याची घटना घडली.
सुदैवाने गोळी हवेत गेल्याने मुस्तफा थोडक्यात बचावला. घटनेनंतर संशयित आरोपी तुषार सोनवणे फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तफा हा मिस्तरी काम करतो. त्याने तुषार सोनवणे याच्याकडे आपल्या कामाचे थकीत पैसे मागितले होते.
याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर तुषारने आपल्याकडील शस्त्र काढून मुस्तफाच्या दिशेने गोळी झाडली. प्रसंगावधान राखत मुस्तफाने स्वतःचा बचाव केल्याने आणि गोळी हवेत सुटल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी पोलिसांना गोळीची पुंगळी आढळून आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी पंचनामा केला असून फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने या घटनेचा निवडणुकीशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “ही घटना पूर्णतः वैयक्तिक वादातून व मजुरीच्या पैशांवरून घडली असून याचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही.”









