जळगाव (संपादक: रजत शेख)
शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीतील शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या आराखड्यांतर्गत विद्यार्थ्यांची पातळीनुसार गटवारी करण्यात येऊन वाचन, लेखन व गणित या मूलभूत कौशल्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन तास, पुनरावृत्ती उपक्रम, कार्यपत्रिका, चित्राधारित अध्यापन तसेच खेळ व कृतीशील शिक्षण पद्धतींचा प्रभावी वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा घेण्यासाठी नियमित मूल्यमापनही करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो, फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या विशेष कृती आराखड्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास निश्चितच मदत होईल.”
शिक्षकवृंदाने पालकांशी समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या घरगुती सरावावर व नियमित उपस्थितीवरही भर दिला आहे. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी स्वागत केले असून, आगामी कालावधीत याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.









