संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी):मराठी राजभाषा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे संवाद कौशल्य व आत्मविश्वास विकास अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी भाषा व साहित्य परंपरेचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मुकेश नाईक होते. त्यांनी मार्गदर्शन करताना मराठी ही आपल्या संस्कृतीची ओळख असून दैनंदिन व्यवहारात मराठीचा अभिमानाने वापर करावा, असे आवाहन केले. पर्यवेक्षिका शितल कोळी यांनी स्पर्धेचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा, आधुनिक काळातील आवश्यकता तसेच सोशल मीडियामधील वाढता वापर यावर विविध मुद्दे मांडले. काही विद्यार्थ्यांनी काव्यपंक्ती व घोषवाक्यांच्या माध्यमातून मराठीप्रेम व्यक्त केले.

उत्कृष्ट वक्त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनीच केले. संपूर्ण कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव आणि अभिमानाची भावना अनुभवायला मिळाली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS