जळगाव (प्रतिनिधी): गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात “हिंद-दी-चादर” हा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादुर यांच्या त्यागमय जीवनकार्याची तसेच धर्मरक्षणासाठी दिलेल्या अद्वितीय बलिदानाची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भक्तीगीतावर आधारित समूहगानाने झाली. विद्यार्थ्यांनी भावपूर्ण सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमातून देशभक्ती, मानवता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला.
याच अनुषंगाने “एकतेत शक्ती” या विषयावर समूह चर्चेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकजुटीचे महत्त्व, परस्पर सहकार्याची गरज आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद यावर आपले विचार मांडले. चर्चेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक मुकेश नाईक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रूपाली आव्हाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत एकता, शिस्त आणि संघभावना या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सहकार्याची भावना आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ झाल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.








