जळगाव(प्रतिनिधी ): होळी सणाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे ‘जंक फूड मुक्त होळी’ हा सामाजिक संदेश देणारा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते विधिवत होळी पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जंक फूडला प्रतीकात्मक निरोप देत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी रूपाली आव्हाड मॅडम यांनी जंक फूडचे दुष्परिणाम आणि त्यापासून उद्भवणाऱ्या शारीरिक समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी संतुलित आहाराचे महत्त्व, घरगुती पौष्टिक पदार्थांचा समावेश आणि नियमित व्यायामाची गरज यावर भर दिला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून ‘आरोग्यदायी होळी, आनंदी होळी’ हा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.









