संत ज्ञानेश्वर विद्यालयात लहानग्यांचे विज्ञान प्रयोग उत्साहात

जळगाव(प्रतिनिधी):संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाचे सोपे, रंजक आणि प्रात्यक्षिक प्रयोग सादर करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लहानग्यांनी विज्ञानातील मूलभूत संकल्पना आनंदाने आत्मसात केल्या.

कार्यक्रमादरम्यान ‘रंग बदलणारे पाणी’ या प्रयोगातून प्राथमिक रंगांपासून नवीन रंगांची निर्मिती कशी होते, हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. ‘बुडते की तरंगते’ या प्रयोगात विविध वस्तू पाण्यात टाकून त्यांचे निरीक्षण करण्यात आले. यामुळे वस्तूंच्या वजन आणि घनतेविषयी प्राथमिक समज विद्यार्थ्यांना मिळाली.

तसेच ‘फुगणारा फुगा’ या प्रयोगातून हवा गरम झाल्यावर तिचा प्रसार कसा होतो, हे सोप्या पद्धतीने समजावण्यात आले. ‘चुंबकाचा जादू’ या प्रयोगात चुंबक लोखंडी वस्तूंना आकर्षित करतो हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले, तर ‘अंकुरण प्रयोगा’तून बियांना पाणी व हवा मिळाल्यास रोप कसे तयार होते याची माहिती देण्यात आली.

या विज्ञान उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण कौशल्य, प्रश्न विचारण्याची सवय आणि विज्ञानाविषयी उत्सुकता वाढीस लागल्याचे शिक्षकांनी सांगितले. मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी बनते, असे मत व्यक्त केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा उपक्रम यशस्वी ठरला.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS