इन्स्टाग्रामवरील ओळखीचा दुर्दैवी शेवट; विवाहितेची हत्या, तरुणाचा मृत्यू

चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. एका तरुणाने विवाहित महिलेवर गोळीबार करून तिचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती असून, त्यानंतर संबंधित तरुणाचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकुलखेडा येथील रहिवासी जगदीश पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील यांची काही महिन्यांपूर्वी शिरपूर येथील देवानंद धनगर या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. मात्र, अलीकडे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती आहे.

घटना काल सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. अनिता यांच्या मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहिले. दरवाजा उघडल्यावर तिला आई व एक तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळले. तिने तत्काळ वडिलांना कळवले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात दोघांमध्ये सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेत वापरलेले शस्त्र संबंधित तरुणाकडे कसे आले, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अकुलखेडा गावात शोक आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS