पाचोरा(प्रतिनिधी ):बसस्थानक परिसरात घडलेल्या पाकीटमारी प्रकरणी पाचोरा पोलिसांनी तीन संशयित महिलांना अटक करून त्यांच्याकडून एकूण ३२,४०० रुपये जप्त केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३.१५ ते ३.४५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी श्रावण ताराचंद पाटील (वय ७० वर्षे, रा. वडगांव खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगांव) हे पाचोरा बसस्थानक येथे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १३,४०० रुपये चोरी करून नेले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक ५११/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) प्रमाणे ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील व पोकॉ/०१३२ श्रीराम अनिल शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाचोरा बसस्थानक येथे तीन महिला पिकपॉकेटिंगसाठी टेहळणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ बसस्थानक परिसरात जाऊन तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.
त्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलीस निरीक्षक राहुलकुमार पंवार यांनी चौकशी केली असता त्यांनी आपली नावे १) निर्मला सुनिल जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, ता. जामनेर), २) सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. हिसोडा खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना, सध्या रा. कुंभारी, ता. जामनेर), ३) उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, रा. कुंभारी, ता. जामनेर) अशी सांगितली. चौकशीत त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.
पंचासमक्ष व महिला पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीत आरोपी क्रमांक १ कडून १३,५०० रुपये, आरोपी क्रमांक २ कडून ६,६०० रुपये व आरोपी क्रमांक ३ कडून १२,३०० रुपये असे एकूण ३२,४०० रुपये जप्त करण्यात आले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पंवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.









