नरडाणा येथे १४.१५ लाखांचा विजेचा तार चोरीचा गुन्हा उघड; राजस्थानातील ६ आरोपी अटकेत

नरडाणा (प्रतिनिधी: राहील देशमुख) :ता. शिंदखेडा, जि. धुळे) – दि. २०/०१/२०२६ ते दि. २४/०१/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत नरडाणा १३२ के.व्ही. सबस्टेशन, बेटावद रोड समोरील विजेच्या पोलपासून ते नरडाणा–मेलाणे रोडदरम्यान, मेलाणे गावाच्या अलिकडील परिसरात अज्ञात चोरट्यांनी विजेच्या पोलवरील कंडक्टर (अॅल्युमिनियम तार) कापून चोरी केल्याची घटना घडली होती. सदर चोरीत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी फिर्यादी आदित्य किशोर पोतदार (रा. लेन नं. ५, रथगल्ली, जय जवान चौक, धुळे) यांच्या तक्रारीवरून नरडाणा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान नरडाणा पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे कसून तपास करत संशयितांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –

नारायणसिंग राजुसिंग (वय ३८, रा. देबीपुरा केरिया, ता. मांडल, जि. भिलवाडा, राजस्थान)

लोकेश बन्सीसिंग रावत (वय २२, रा. वरप्रमाणे)

हिरासिंग धनासिंग रावत (वय २८, रा. छाजवो का खेड़ा, केरिया, ता. मांडल, जि. भिलवाडा, राजस्थान)

प्रकाशसिंग लालसिंग रावत (वय २८, rा. भेरुखेडा, ता. मांडल, जि. भिलवाडा, राजस्थान)

भवानीसिंग लालसिंग रावत (वय ३०, रा. भेरुखेडा, ता. मांडल, जि. भिलवाडा, राजस्थान)

राधेश्याम गणेशसिंग रावत (रा. मोटी, ता. बदनोर, जि. भिलवाडा, राजस्थान)

आरोपींना चोरीसाठी वापरलेल्या साधनांसह व वाहनासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळाली. चौकशीत आरोपींनी चोरी केलेला माल गुजरात राज्यातील वडोदरा येथील हितेशसिंह उर्फ इकतेश्वर नरेंद्रसिंह यास विकल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील तपासात हा माल लाठी, जि. अमरेली (गुजरात) येथील सुमरा निसार अहमद उस्मानभाई यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले. संबंधिताकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल :

रु. ३,७५,००० किंमतीचे विजेच्या पोलवरील कंडक्टरचे ५ बंडल (अॅल्युमिनियम तार)

रु. १०,००,००० किंमतीचे आयशर कंपनीचे वाहन (क्र. RJ-06/GC-7265)

रु. ३०,००० किंमतीचे ४ अँड्रॉईड मोबाईल

रु. १०,००० किंमतीची चोरीसाठी वापरलेली साधने (२ लोखंडी कटर, २ लाकडी फळी असलेले झुले, १ लोखंडी पकड, १ इलेक्ट्रिक वजन काटा)

एकूण रु. १४,१५,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोउनि रविंद्र महाले, सायबर सेल पोउनि संजय पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

सदर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करून पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS