म्हसवड ( प्रतिनिधी):
सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत उल्लेखनीय कामगिरी करत म्हसवड पोलीस ठाण्याने जानेवारी 2026 महिन्यात चार मानाचे पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ट ठाण्याचा किताब मिळवला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य, गुन्ह्यांवर तात्काळ कारवाई आणि जनजागृती उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे ही अभूतपूर्व कामगिरी शक्य झाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उत्कृष्ट समन्वय आणि संवेदनशील दृष्टीकोनातून काम करत जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केला. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मासिक क्राईम कॉन्फरन्समध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाण्याचा गौरव करण्यात आला.
म्हसवड पोलीस ठाण्याने जानेवारी महिन्यात सर्वाधिक शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देत मुलींच्या सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवली. ‘गुड टच–बॅड टच’सारख्या संवेदनशील विषयांवर मार्गदर्शन, छेडछाड प्रतिबंधासाठी विशेष मोहीम, रोड रोमियोविरोधात कारवाई आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत कशी मिळवावी याबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. या प्रभावी उपक्रमांमुळे ठाण्याला “सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही ठाण्याने वेग आणि अचूकता दाखवली. महिलांविरोधातील प्रकरणात 24 तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. नॉन-बेलेबल वॉरंट प्रकरणांमध्ये 15 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, ज्यासाठी “सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी” पुरस्कार मिळाला.
या यशात भगवान सजगणे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, सतीश जाधव, विकास ओंबासे, कोमल काळेल आणि ज्योती सरगर यांचेही योगदान मोलाचे ठरले. जनतेचा विश्वास आणि महिलांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत म्हसवड पोलीस ठाणे सातारा जिल्ह्यात प्रेरणादायी कार्य करत आहे.









