जळगाव :(रजत शेख)शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची चोरटी विक्री करणाऱ्या एका इसमावर एम.आय.डी.सी. पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. सदर कारवाईत सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
दि. ३०/१२/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांना गोपनीय माहिती मिळाली की, रामेश्वर कॉलनीतील साई गजानन अपार्टमेंट येथे एक इसम प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात नायलॉन मांजाचे रिळे साठवून ठेवत आहे. ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक यांना कळविण्यात आली. खातरजमा केल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार पोउपनि. चंद्रकांत धनके यांनी दोन पंचांना बोलावून पोकॉ/291 नितीन ठाकुर, पोकॉ/342 किरण पाटील, पोकॉ/677 राहुल घेटे, पोकॉ/2030 गणेश ठाकरे यांच्यासह खाजगी वाहनाने रामेश्वर कॉलनीकडे रवाना झाले. साई गजानन अपार्टमेंटजवळ वाहन थांबवून पायी वरच्या मजल्यावर जाऊन एका घरात डोकावून पाहिले असता एक इसम कापडी थैली हातात घेऊन बसलेला आढळून आला.
पंचांसमक्ष सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव विनोद विजय दराडे (वय ४४), रा. साई गजानन अपार्टमेंट, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे सांगितले. त्याच्या ताब्यातील कापडी थैलीची तपासणी केली असता “हिरो प्लस” नावाचे १५ नग प्रतिबंधित नायलॉन मांजाचे रिळे आढळून आली. प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे एकूण ३०,००० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून आरोपीसह नायलॉन मांजाचे रिळे ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९४४/२०२५ अंतर्गत BNS 2023 चे कलम 125, 223 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 5 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोना/1247 पंकज पाटील हे करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गनापुरे व मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राहुल तायडे, पोउपनि. चंद्रकांत धनके, पोकॉ किरण पाटील, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ गणेश ठाकरे व पोकॉ राहुल घेटे यांनी केली.









