(संपादक : रजत शेख)
गेल्या महिनाभरापासून जळगाव शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक मा. श्री अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथके गठित करून तपासाची जबाबदारी सोपवली. पथकाने सातत्याने घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी चंदन राजू जुनी (वय ४५, रा. सरदारपाडा वस्ती, उल्हासनगर–१, ता. कल्याण, जि. ठाणे) याची ओळख पटली.
पोलिसांनी सदर आरोपीस कोठारी व्हीलच्या शेजारी, रामटेकडी, हडपसर (पुणे) येथून ताब्यात घेतले. अधिक चौकशीत आरोपीने जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सीसीटीएनएस क्रमांक २५१/२०२५ व २५२/२०२५ (बीएनएस २०२३ कलम ३३१(४), ३०५) अंतर्गत नोंद असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
तसेच हे गुन्हे त्याचा भाऊ कुलदीप राजू जुनी व इतर दोन साथीदारांसह केल्याचेही त्याने मान्य केले आहे.
गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, आरोपीने सांगितले की त्याचा भाऊ कुलदीप याने चोरीच्या मालाची विल्हेवाट लावून त्याच्या वाट्याचे ३८,००० रुपये ऑनलाईन त्याच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.
आरोपी चंदन राजू जुनी यास पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीस ठाणे, जळगाव यांच्या ताब्यात देण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश ढिकले हे करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
- कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, अतुल वंजारी, पोहवा विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बावीस्कर, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, महेश सोमवंशी तसेच तांत्रिक सहाय्यक ईश्वर पाटील, गौरव पाटील, मिंलीद जाधव व नेत्रम विभागाचे पंकज खडसे, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास यांनी सहभाग घेतला.









