जळगाव (रजत शेख):
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६ जानेवारी) एमआयडीसी परिसरात सुरू असताना मोठा गोंधळ उडाला. पिंप्राळा परिसरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये फेरमतमोजणीची मागणी करत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पिंप्राळा प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण वीरभान पाटील यांनी फेरमतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज नियमबाह्य ठरवत फेटाळला व त्याबाबत लेखी आदेशही दिला होता.
तरीही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निर्णय मान्य न करता मतमोजणी केंद्राबाहेर वखार महामंडळाच्या परिसरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने बॅरिकेट तोडून पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे तसेच कॉन्स्टेबल विजय रंधे, मोहित सोनवणे व अविनाश राजपूत हे जखमी झाले. सर्व जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे, जमाव जमवून दंगा करणे, घोषणाबाजी करणे, बॅरिकेट तोडणे व दगडफेक करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण वीरभान पाटील, त्यांचे बंधू पंकज वीरभान पाटील यांच्यासह सुमारे २०० ते २५० जणांचा समावेश आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पिंप्राळा परिसरासह संपूर्ण जळगाव शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









