जळगाव (जिल्हा प्रतिनिधी: इम्रान खान) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात चरित्र वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचत संविधान मूल्यांप्रती निष्ठा व लोकशाही तत्त्वांप्रती बांधिलकी व्यक्त केली.
यानंतर घेण्यात आलेल्या चरित्र वाचन सत्रात विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित निवडक लेख प्रभावीपणे सादर केले. भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे मोलाचे योगदान, शिक्षणाविषयीची त्यांची दूरदृष्टी, सामाजिक समानता व न्यायासाठी केलेला अथक संघर्ष यांसह विविध पैलू विद्यार्थ्यांनी उत्कटतेने मांडले.
विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण वाचनातून डॉ. आंबेडकर यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि समाजपरिवर्तनासाठीची त्यांची कार्यपरंपरा उजळून निघाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाण, मानवता, बंधुता आणि समान हक्कांची जाणीव अधिक दृढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा आदर राखण्याचे, शिक्षणाचे महत्त्व ओळखण्याचे आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.









