Home गुन्हे तांबापुरा परिसरात क्रिकेटवरून दोन गटांत हाणामारी; दगडफेकीत तीन तरुण जखमी

तांबापुरा परिसरात क्रिकेटवरून दोन गटांत हाणामारी; दगडफेकीत तीन तरुण जखमी

0
तांबापुरा परिसरात क्रिकेटवरून दोन गटांत हाणामारी; दगडफेकीत तीन तरुण जखमी
Oplus_131072

 

जळगाव (प्रतिनिधी) — शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज (शनिवार) दुपारी सुमारास क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. हा वाद चांगलाच चिघळत हाणामारी आणि दगडफेकीत परिवर्तित झाला. या घटनेत तीन तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळणारे हे तरुण तांबापुरा परिसरातील गवळीवाडा आणि बिलाल चौक येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक उसळलेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना तात्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ, गणेश वाघ, पीएसआय चंद्रकांत धनके आणि अशोक काळे यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

 

पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिसरात शांतता प्रस्थापित केली असून, या प्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनमार्फत सुरू आहे.