Home गुन्हे कांचन नगरात गोळीबार; ‘टपऱ्या’चा मृत्यू, दोन जखमी – हद्दपार आरोपी

कांचन नगरात गोळीबार; ‘टपऱ्या’चा मृत्यू, दोन जखमी – हद्दपार आरोपी

0
कांचन नगरात गोळीबार; ‘टपऱ्या’चा मृत्यू, दोन जखमी – हद्दपार आरोपी
Oplus_131072

जळगाव (संपादक: रजत शेख): जुन्या वादातून निर्माण झालेला तणाव अखेर रक्तरंजित स्वरूपात समोर आला. रविवारी (दि. ९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कांचन नगर परिसरात झालेल्या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर उर्फ ‘टपऱ्या’ (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, गोळीबार करणारा मुख्य आरोपी आकाश सपकाळे उर्फ ‘डोया’ हा हद्दपार असूनही शहरात येऊन ही घटना घडवून पसार झाला आहे.

 

घटनाक्रम :

आकाश सपकाळे आणि सागर सपकाळे यांच्यात जुना वाद होता. रविवारी संध्याकाळपासून दोघांमध्ये वादाचे सत्र सुरू झाले होते. रात्री हा वाद चिघळत गेला आणि आकाश सपकाळे हा सागर सपकाळे यांच्या घरासमोर पोहोचला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने थेट गोळीबार केला.

 

या गोळीबारात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला, तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला गोळी लागली. तर आकाश युवराज बाविस्कर (टपऱ्या) याच्या छातीत गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. सर्व जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच आकाश बाविस्कर याचा मृत्यू झाला.

 

पोलीसांची धावपळ :

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गनापुरे, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलापूरकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू आहे.

 

हद्दपारीचे उल्लंघन करून शहरात येऊन गोळीबार करणाऱ्या आरोपी आकाश सपकाळेच्या अटकेसाठी पोलीसांनी विशेष पथके तयार केली असून, त्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.