खळबळजनक घटना : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जळगाव तालुक्यातील एका भागात वास्तव्यास आहे. संशयित आरोपी संदीप बळीराम तायडे (रा. चिंचोली, ता. जळगाव) याने जानेवारी महिन्यापासून मुलीच्या बालमनाचा गैरफायदा घेत तिला गोड बोलून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्याने पीडितेचा विनयभंग केल्याचीही माहिती समोर आली आहे.

दि. २ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता, आरोपीने पीडितेला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घरातून नेले. मात्र तिला शाळेत न नेता अजंठा चौफुलीवरून भुसावळ रोडने नशिराबाद शिवारातील एका शेतात नेले. तेथील एका झोपडीत नेऊन आरोपीने तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून ४ मार्च रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६३(अ), ६४(१), ६५(१), ७४, ३५१(४) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६, १० आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पोलिसांनी संशयित आरोपी संदीप तायडे याला अटक केली आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS