गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र धारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांना गुप्त माहिती मिळाली की, मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहूनगर, जळगाव) हा उस्मानिया पार्क, शिवाजीनगर परिसरात मोटरसायकलवर गावठी कट्टा घेऊन फिरत असून परिसरात दहशत निर्माण करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय संबंधित मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३७/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा १९५९ च्या कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच पथकातील फौजदार अतुल वंजारी, पोहेका विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, विलेश सोनवणे, किशोर पाटील आणि रविंद्र कापडणे यांनी पार पाडली.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आला आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS