अमळनेर येथे बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती छापा; ₹3.07 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर(प्रतिनिधी):राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमळनेर शहरात बनावट देशी व विदेशी मद्य तयार करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या अड्ड्यावर मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹3,07,834 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव-जवखेडा-मांडळ रोड, ढुळे रोड परिसरातील आर. के. नगर भागातील एका घरातून बनावट मद्यनिर्मिती सुरू असल्याची गुप्त माहिती विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 12.30 वाजता दुय्यम निरीक्षक व पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी घरामध्येच मद्यनिर्मिती सुरू असल्याचे उघड झाले.

जप्त मुद्देमालात समावेश :

हिरो होंडा डिलक्स दुचाकी

750 मि.ली. क्षमतेच्या परराज्यातील मार्किंग असलेल्या विदेशी मद्याच्या 48 बाटल्या

सुमारे 620 देशी दारूचे टँग पाउच

रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, झाकणं व कॅप्स

विविध ब्रँडचे देशी-विदेशी मद्याचे स्टिकर्स

200 लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम (मद्यनिर्मितीसाठी)

बनावट सील करण्याचे मशीन

25 लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये साठवलेले तयार मद्य

मोटारसायकल व इतर साहित्य

जप्त मालाची एकूण अंदाजे किंमत ₹3,07,834 इतकी आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध व बनावट मद्यनिर्मितीमुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर विभागाकडून कडक नजर ठेवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून अवैध मद्यविक्री व उत्पादनाविरोधात विभागाने अशीच कठोर भूमिका कायम ठेवावी, अशी मागणी व्यक्त केली आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS