संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे स्वाक्षरीतून उमटलाएकतेचा संदेश‘रंग एकतेचे’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव(प्रतिनिधी ): होळी सणाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे “रंग एकतेचे” या अभिनव स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले. सणाच्या माध्यमातून समाजात एकता, बंधुभाव आणि सकारात्मक विचारांचा संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून केला.

शाळेच्या प्रांगणात इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजविलेला आकर्षक फलक उभारण्यात आला होता. प्रत्येक रंगासोबत एक सामाजिक संकल्प जोडण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी त्या संकल्पांना मान्यता देत स्वाक्षरी करून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

“रंगांनी नव्हे, मनांनी जोडूया नाती”, “पर्यावरण जपा”, “पाणी वाचवा”, “स्वच्छता राखा” अशा संदेशांनी शाळा परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, जबाबदारीची भावना आणि सामूहिक ऐक्य अधिक दृढ झाले.

यावेळी मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत, सणांच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडविणे हीच शिक्षणाची खरी दिशा असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षकवृंदांनीही उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

या अनोख्या स्वाक्षरी अभियानामुळे होळीचा सण रंगांसोबतच सामाजिक एकतेच्या भावनेने अधिक अर्थपूर्ण ठरला.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS