वापी येथे जळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू; गावावर शोककळा

जळगाव(जिल्हा प्रतिनिधी इमरान खान): नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील भोकर येथील प्रफुल्ल सुनील पाटील (वय २२) याचा गुजरातमधील वापी येथे भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे भोकर गावावर शोककळा पसरली असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रफुल्ल पाटील हा गेल्या दीड वर्षांपासून वापी येथील अग्निशमन विभागात कार्यरत होता. मंगळवारी (दि. १७ मार्च) रात्री सुमारे साडेदहा वाजता ड्युटी संपवून तो आपल्या निवासस्थानी परतला होता. जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रफुल्लला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रफुल्ल हा मेहनती आणि जिद्दी युवक म्हणून ओळखला जात होता. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने अल्पवयातच अग्निशमन विभागात नोकरी मिळवली होती. त्याचे वडील सुनील पाटील हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

प्रफुल्लच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा मोठा आधार हिरावला गेला असून त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि आजी असा परिवार आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS