जळगाव :(रजत शेख)| शहरातील सुभाष चौक परिसरातील नामांकित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अँड सन्स) येथे ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची साखळी चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी आरोपीने चोरीच्या सोन्याची लगड तयार केली होती, तीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
९ जानेवारी २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीने ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याची साखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून त्याने १९.३५० ग्रॅम वजनाची व सुमारे २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी तेलंगणा राज्यातील सायबराबाद परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सायबराबाद येथे जाऊन भास्कर किसन बानोथ (वय २२, रा. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. ओळख पटू नये म्हणून त्याने चोरलेली सोन्याची साखळी वितळवून तिची लगड तयार केली होती. मात्र पोलिसांनी ही लगड हस्तगत करत गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले व पथक अधिक तपास करत आहेत. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर व महेश सोमवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









