जळगाव (प्रतिनिधी : राजू शेख)
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रांजल रमेश ठाकूर (वय १६, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. ती आपल्या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. ही बाब लक्षात येताच तिचे वडील रमेश शांताराम ठाकूर यांनी तिला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
सिव्हिल हॉस्पिटलकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत असून, त्यांना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.









