जळगाव (प्रतिनिधी : अमृत सपकाळे)
शहरातील निवृत्ती नगर परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षल वासुदेव मोरे (वय २८, रा. निवृत्ती नगर, ता. व जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल मोरे याने २४ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून विषारी पदार्थ सेवन केला होता. त्याची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने जिल्हापेठ पोलीस ठाण्याला दिली असून, त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.









