जिल्हापेठ पोलीसांची धडाकेबाज कारवाई : २ गावठी कट्टे, ८ तलवारींसह दोघ जेरबंद

जळगाव(प्रतिनिधी ): शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हापेठ पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २ गावठी कट्टे व ८ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी धीरज कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू करण्यात आली.

दरम्यान, आर. आर. शाळेजवळील गल्लीत पेट्रोलिंग करत असताना (क्र. एमएच १९ ए जेड २४१२) या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून येणारे दोन संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव) व अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) अशी त्यांची ओळख पटली.

झडतीदरम्यान मोटारसायकलला बांधलेल्या पोतडीत एक तलवार आढळली. अधिक तपासणी केल्यावर पेट्रोल टाकीखाली इंजिनजवळ लपवलेला एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. पुढील तपासात आणि ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींकडून आणखी शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. एकूण २ गावठी पिस्टल व ८ तलवारी पोलिसांनी जप्त केल्या.

अटक आरोपी धीरज कोळी याच्यावर धरणगाव व रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व मारामारीचे गुन्हे दाखल असून तो खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. तर अजय डोळे याच्यावर नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई सपोनि अनिल वाघ, पो. उपनि गोपाळ देशमुख तसेच जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकातील महेश महाजन, तुषार पाटील, गोविंद साबळे, विशाल साळुंखे, समाधान पाटील, राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर, ईश्वर खवडे, जयेश मोरे, साहेबराव खैरनार यांनी केली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS