जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान) : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली आहे. परमेश्वर गजानन बांबर्डे (रा. जुने जळगाव, गोपाळपुरा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना गोपनीय बातमीदारामार्फत रथ चौक परिसरात एक इसम अवैधरित्या पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी नाईट गस्तीवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिसांनी रथ चौकात जाऊन संशयित परमेश्वर बांबर्डे याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुनील कदम, पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, युवराज कोळी, अजय निकम, पोलीस कॉन्स्टेबल नवजित चौधरी, सतीश भारूळे आणि निलेश घुगे यांचा समावेश होता.






