जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरासह चोपडा, पिंपळा परिसर आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या चोरीच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगाव येथील रथचौक, पिंप्राळा परिसरातील बापू दत्तू कोळी यांच्या मालकीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक MH-19 BE-8161) ही ९ नोव्हेंबर रोजी रात्री घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कांचननगर परिसरातून निर्मल राजेंद्र ठाकूर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने साथीदार मनोज मोहन रंधे (रा. नशिराबाद) याच्यासोबत मिळून जळगाव शहर, चोपडा, पिंप्राळा परिसर आणि इच्छादेवी चौकातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी मनोज रंधे याला नशिराबाद येथून ताब्यात घेऊन १६ नोव्हेंबर रोजी अटक केली. दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान चोरीच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
हस्तगत केलेल्या दुचाकी अशा :
1. बजाज प्लॅटिना (काळा रंग) – किंमत १५ हजार रुपये. रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
2. हिरो फॅशन प्रो – किंमत ३० हजार रुपये. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
3. बजाज प्लॅटिना – किंमत २५ हजार रुपये. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
4. हिरो सीडी डिलक्स – किंमत २० हजार रुपये.
5. बजाज सीटी १०० (लाल रंग) – किंमत १० हजार रुपये. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अशा एकूण एक लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास पुढे जाण्यास मदत झाली आहे.
या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंधाटे, मुकुंद गवते आणि सागर नन्नवरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






