रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; २४ तासांत जबरी चोरी करणारी टोळी जेलबंद ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रावेर (प्रतिनिधी): रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी गोवर्धनदास सफरमल कोटवाणी (रा. रावेर) हे १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.४५ वाजता विवरे बु॥ येथे दुकानाच्या उधारीचे पैसे गोळा करून रावेरकडे येण्यासाठी विवरे बसस्थानकावर उभे होते. त्यावेळी एका अनोळखी मोटारसायकलस्वाराने “मी रावेरला जात आहे, माझ्यासोबत चला,” असे सांगून त्यांना मोटारसायकलवर बसवले.

रावेरकडे येत असताना पारश्या नाल्याजवळ चौकीच्या शेजारी शेताच्या बाजूला मोटारसायकल थांबवून तेथे उभ्या असलेल्या आणखी दोन अनोळखी इसमांच्या मदतीने फिर्यादींना धमकावण्यात आले. त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १५,००० रुपये जबरदस्तीने काढून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ७७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी

मोहम्मद उबेद मोहम्मद एजाज (रा. नागझिरी चौक, रावेर)

शेख मोईन शेख नईम (रा. विवरे बु॥, ता. रावेर, जि. जळगाव)

रेहानखान जावेद खान (रा. विवरे बु॥, ता. रावेर, जि. जळगाव)

यांना ताब्यात घेऊन अटक केली.

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेले १५,००० रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ३५,००० रुपये किंमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. MH-02-CN-5376) असा एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS