श्रीरामपूर (महाराष्ट्र प्रतिनिधी :मसूद सय्यद): शहरातील जातीय सलोखा बिघडवून शांतता भंग करण्याचा काही प्रवृत्तींकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, अशा घटकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राम–रहीम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांबाबत आ. ओगले व नगराध्यक्ष करणा ससाणे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देत पोलिस प्रशासनाला जाब विचारला. यावेळी नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर, वकील तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांत श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारी वाढली असून खुलेआम हल्ले, मारामाऱ्या तसेच अवैध शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस यंत्रणेची भूमिका निष्क्रिय दिसत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अलीकडील घटनांचा उल्लेख करत निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या उत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीराम नवमीच्या झेंडा मिरवणुकीवर दगडफेक झाली. काही स्वयंघोषित धर्मरक्षकांनी यात्रेत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत यात्रा विस्कळीत करण्याचा घाट घातला. यानंतर श्रीराम मंदिर चौकात भर यात्रेत पुन्हा एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला.
या सलग घटनांमुळे सणासुदीच्या काळात शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. “समाजकंटकांना कोणताही धर्म किंवा जात नसते; अशा घटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास श्रीरामपूरचे नागरिक कायदेशीर मार्गाने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती मुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, व्यापारी असोसिएशनचे राहुल कोठारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









