अमलेश्वर नगर गोळीबार प्रकरण : मित्राकडूनच खून; आरोपी अटकेत

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील अमलेश्वर नगर परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणाने खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात या प्रकरणात धक्कादायक उलगडा झाला असून मयताचा मित्रच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. भूषण देविदास महाजन याने अरुण सुरेश महाजन याचा गोळी झाडून खून केल्याचे समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ रोजी रात्री सुमारे सव्वा नऊच्या सुमारास अरुण महाजन यांनी पत्नीला दवाखान्यात दाखल करून पायी चालत मित्र भूषण महाजन यांच्या घरी गेले होते. काही वेळातच भूषणने फोन करून अरुण यांना चक्कर येऊन पडल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर अरुण यांना गोळी लागून मृत्यू झाल्याचे उघड झाले.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय रवींद्र पिंगळे यांच्यासह पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी भूषणच्या घराची झडती घेऊन महत्त्वाचे नमुने जप्त केले आहेत.

दरम्यान, मयताचा भाऊ नरेंद्र महाजन यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

  1. तसेच, आरोपी भूषण महाजन हा नाशिक येथून अवैध कट्टे आणून अमळनेर व पारोळा परिसरात विक्री करत असल्याचीही चर्चा असून पोलिसांकडून या बाबत सखोल चौकशी सुरू आहे. परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS