जळगाव (प्रतिनिधी ) महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री व साठ्यावर आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
आज (दि. १२) अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव डॉ. व्ही. टी. भुक्न यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व परिसरात मोठी कारवाई करण्यात आली.
निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांनी विविध ठिकाणी धाडी टाकून अवैध दारूधंद्यावर कारवाई करत एकूण ३ गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई निरीक्षक डी. एम. चकोर, निरीक्षक के. डी. वराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एम. मोरे, जवान आर. डी. जंजाळे, पी. पी. लायडे, जी. डी. आहिरे, अमोल पाटील व धनसिंग पावरा यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
निवडणूक कालावधीत आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ३२ गुन्हे नोंदविले असून, त्यामध्ये
गावठी हातभट्टी दारू – १५१५ लिटर,
देशी दारू – २३ व्ही. एल.,
बिअर – ७ बॉक्स,
ताडी – ८७ लिटर,
कच्चे रसायन – २२१० लिटर
असा एकूण ₹२,२३,१७५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अवैध ढाबे व हॉटेल्सविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, शहरात रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेला कोणतीही बाधा येऊ नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निवडणूक संपेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या मोहिमेत निरीक्षक डी. अशोक लाप, निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला आहे.









