मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) : दारूच्या नशेत असलेल्या ३० वर्षीय ट्रॅक्टर चालकाने भरधाव ट्रकखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाळधी ते तरसोद हायवे बायपासवर घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विशाल राजेंद्र बाविस्कर (वय ३०, रा. लिंगा, ता. नेपानगर, ह.मु. आसोदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल बाविस्कर हा ट्रॅक्टर घेऊन पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावरून जात असताना त्याचा समोरून येणाऱ्या टाटा पंच कारशी अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी कारमधील व्यक्ती तसेच विशालचे नातेवाईक जमा झाले.

विशाल हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने उपस्थितांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक समजावत असतानाच त्याने अचानक समोरून येणाऱ्या ट्रक कंटेनरखाली स्वतःला झोकून दिले. या घटनेत त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत श्रीराम पाटील करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS