जळगाव (प्रतिनिधी) – शहरात पुन्हा एकदा वेगाच्या बेफिकीरीमुळे भीषण अपघात घडला आहे. अयोध्या नगर परिसरातील माधुरी वेअर हाऊसजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगर येथील दीपक अरुण राऊत (वय ३८) हे २ एप्रिल रोजी दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या बुलेट दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. त्यावेळी अयोध्या नगरमधील माधुरी वेअर हाऊससमोर समोरून येणाऱ्या डंपरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या धडकेत राऊत यांच्या दोन्ही पायांना, हाताला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची दुचाकीही पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहे. अपघातानंतर चालकाने थांबून मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जखमी दीपक राऊत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे करीत आहेत.
शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.








