भावाला मेसेज केल्याच्या कारणावरून तरुणावर चॉपर हल्ला; कुसुंबा हादरले

जळगाव (प्रतिनिधी) : किरकोळ कारणातून मोठा वाद उद्भवून एका तरुणावर चॉपरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कुसुंबा येथे घडली आहे. “माझ्या भावाला मेसेज का करतो?” या प्रश्नावरून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचला आणि यात २९ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला.

अविनाश बन्सीलाल पाटील (वय २९, रा. कुसुंबा) हे शनिवारी (दि. ४ एप्रिल) दुपारी सुमारास गावातील एका पानटपरीसमोर उभे असताना आरोपींनी त्यांना गाठले. यावेळी ओम मनोज ठाकरे याने त्यांच्याकडे जाब विचारत वाद घातला. सुरुवातीला शब्दांमध्ये सुरू झालेला वाद काही क्षणांतच तीव्र झाला.

वाद वाढताच ओम ठाकरे याने हातातील लोखंडी चॉपरने अविनाश पाटील यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. त्याचवेळी यश मनोज ठाकरे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात अविनाश पाटील गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर जखमी अवस्थेत अविनाश पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ओम मनोज ठाकरे, यश मनोज ठाकरे आणि मनोज ठाकरे (सर्व रा. कुसुंबा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन करत असून, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

स्थानिक परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS