विनापरवाना शहरात वास्तव्य; तडीपार गुन्हेगार ‘खेकडा’ एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी: तंजिल शेख)

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १८ महिन्यांसाठी तडीपार केलेला गुन्हेगार शहरातच विनापरवाना वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आले असून, एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

अमन उर्फ ‘खेकडा’ रशीद सय्यद (वय २४, रा. पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘एच’ सेक्टरमध्ये, पुष्पा पेट्रोल पंपाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

रविवारी (दि. ११ जानेवारी) रात्री सुमारे १०.३० वाजता पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता, तडीपार असलेला अमन उर्फ खेकडा हा आढळून आला.

चौकशीत त्याला जळगाव जिल्ह्यातून दीड वर्षासाठी (१८ महिने) हद्दपार केल्याचे स्पष्ट झाले. मात्र तडीपारीचा आदेश लागू असतानाही, कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता तो शहरात वास्तव्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजीव मोरे करीत आहेत.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS