जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या सुभाष मोतीराम पाटील (वय ५३) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष पाटील हे पत्नी व तीन मुलांसह हरिविठ्ठल नगरात वास्तव्यास होते. रविवारी सकाळी कुटुंबातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारच्या सुमारास ते घरी एकटे असताना त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीव दिला.
सायंकाळी त्यांचा मुलगा घरी परतला असता, वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोहेकॉ जितेंद्र राठोड यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुभाष पाटील यांना मृत घोषित केले.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास रामानंदनगर पोलिसांकडून सुरू आहे.









