मैदानी चाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना अखेरची संधी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील १७१ पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेला आता अंतिम टप्पा गाठला असून, मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिलेल्या पुरुष उमेदवारांना अखेरची संधी देण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ११ फेब्रुवारी २०२६ पासून ज्यांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी नियोजित होती आणि काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत, अशा सर्व पुरुष उमेदवारांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजता चाचणीस्थळी योग्य कारणासह हजर राहावे. ही पुरुष उमेदवारांसाठी अंतिम (राखीव) संधी असेल. यानंतर कोणत्याही पुरुष उमेदवाराचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. महिला उमेदवारांसाठी २२ फेब्रुवारी हा संपूर्ण भरती प्रक्रियेचा अंतिम दिवस राहणार आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांनी सर्व संबंधित उमेदवारांना सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन नियोजित दिवशी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ठळक बाबी :

एकूण रिक्त पदे : १७१ पोलीस शिपाई

पुरुष उमेदवारांसाठी अखेरची संधी : २० फेब्रुवारी २०२६, सकाळी ५.०० वा.

महिला उमेदवारांची चाचणी : २१ व २२ फेब्रुवारी २०२६

संपूर्ण भरती प्रक्रियेचा समारोप : २२ फेब्रुवारी २०२६

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS