वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ४० हजारांची लाच मागितली; १५ हजार रुपये घेताना महावितरणचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

Spread the love

जळगाव: (प्रतिनिधी: आसमा शेख):वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात सहाय्यक अभियंत्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञ अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात करण्यात आली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका ४० वर्षीय रहिवाशाच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यात आले होते. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन नवीन मीटरची तपासणी केली. यावेळी घरातील विद्युत उपकरणांचे फोटोही काढण्यात आले.

 

त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञाने तक्रारदाराला फोन करून पांडे चौकात बोलावले. तेथे घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे तसेच सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला. वीज चोरीची कारवाई टाळायची असल्यास ४० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा वीज चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी कथित मागणी करण्यात आली.

 

या प्रकारानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले.

 

त्यानुसार एसीबीच्या पथकाने पांडे चौक येथे सापळा रचला. यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञाने तक्रारदाराला लाचेची रक्कम सहाय्यक अभियंत्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे यांनी १५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत अन्य दोन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले.

 

या तिघांवर कारवाई

 

१) विशाल वसंत नेमाडे (वय ३७) – सहाय्यक अभियंता, महावितरण, जळगाव.

 

२) भरत कडू तायडे (वय ४५) – वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण, जळगाव.

 

३) रविंद्र छन्नू पाटील (वय ४१) – वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण, जळगाव.

 

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

 

पोलीस अधिकारी व पथक

 

या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे यांनी केले. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा पथकात पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांचा समावेश होता.

 

या कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

लाच मागितल्यास एसीबीकडे तक्रार करा

 

शासकीय कामासाठी कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

सातारा तालुका पोलिसांचा गांजा तस्करांवर मोठा प्रहार! २४ किलो...

सातारा (प्रतिनिधी : मोसिन शेख ) : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, सातारा तालुका पोलिसांच्या...

जळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, चोरीच्या पाच...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरासह चोपडा, पिंपळा परिसर आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत...

जळगावच्या रथ चौकात पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल...

जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान) : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी धडक...

संपादक - रजत शेख

Latest