जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख): जिल्हा परिषद बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला असून, रस्त्याच्या कामाचे बिल मंजुरीसाठी पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
या कारवाईत उपविभागीय अधिकारी सतीष मनसुलाल शिसोदे (वय ५५, रा. आदर्शनगर, जळगाव) आणि कनिष्ठ अभियंता भागवत वसंता चवरे (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार हे ४२ वर्षीय ठेकेदार असून, त्यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सन २०२५-२६ या वर्षात गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे ९ लाख ९० हजार ७६३ रुपयांचे काम केले होते. या कामाची मोजणी पुस्तिका (एमबी) आणि बिले तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी यापूर्वी २० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, काम पूर्ण होऊनही बिलांना मंजुरी मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बांधकाम उपविभागीय अधिकारी कार्यालयात विचारणा केली. त्यावेळी बिलांवर स्वाक्षरी करून पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्याकरिता उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्के प्रमाणे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तडजोडीनंतर १० हजारांची मागणी
तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. यावेळी कनिष्ठ अभियंता चवरे यांनी सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन १ टक्का प्रमाणे १० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली.
पंचांसमक्ष स्वीकारली लाचेची रक्कम
सोमवारी सापळा रचण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारले आणि ही रक्कम उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्याकडे दिली. शिसोदे यांनीही ती रक्कम स्वीकारून स्वतःकडे ठेवली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने ही लाचेची रक्कम जप्त केली.
या कारवाईदरम्यान शिसोदे यांच्या अंगझडतीत ॲपल कंपनीचा मोबाईल आणि ९१ हजार ६२० रुपये रोख, तर चवरे यांच्या अंगझडतीत विवो कंपनीचा मोबाईल आणि २० हजार ६०० रुपये रोख रक्कम आढळून आली.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा पथकात पोलीस हवालदार बाळू मराठे आणि महिला पोलीस हवालदार संगीता पवार यांचा समावेश होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लाच मागितल्यास तक्रार करा
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.







